दौंड पोलिसांची बनावट भारतीय चलन प्रकरणात मोठी कारवाई; पाच आरोपी अटकेत, मुख्य सूत्रधारांच्या शोधाला वेग
July 22, 2026
0
सत्यवेध | दौंड | दत्तात्रय यादव-:
दौंड शहरातील ॲक्सिस बँकेच्या कॅश डिपॉझिट मशीनमध्ये बनावट भारतीय चलनी नोटा (Fake Indian Currency Notes) जमा केल्याप्रकरणी दौंड पोलिसांनी महत्त्वपूर्ण कारवाई करत पाच आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून, बनावट नोटा तयार करणारे व त्यांचा पुरवठा करणाऱ्या मुख्य सूत्रधारांपर्यंत पोहोचण्यासाठी तपासाची व्याप्ती वाढविण्यात आली आहे.
दौंड विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी (डीवायएसपी) बापूराव दडस यांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. 16 जुलै 2020 रोजी पहाटे सुमारे 2 वाजण्याच्या सुमारास काही व्यक्तींनी दौंड येथील ॲक्सिस बँकेच्या कॅश डिपॉझिट मशीनमध्ये संशयास्पद चलनी नोटा जमा केल्या. त्यानंतर ॲक्सिस बँकेचे शाखा व्यवस्थापक महेश माने यांनी या नोटांची तपासणी केली असता त्या बनावट भारतीय चलनी नोटा असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी नियमानुसार जप्ती पंचनामा (Seizure Memo) तयार करून दौंड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
या तक्रारीच्या आधारे दौंड पोलिस ठाण्यात गुन्हा क्र. 4039/2020 अंतर्गत बनावट भारतीय चलन बाळगणे व वापरणे या संदर्भातील संबंधित कायदेशीर कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
तपासादरम्यान कॅश डिपॉझिट मशीनमध्ये नोटा जमा करणारे तसेच या रॅकेटशी संबंधित व्यक्तींचा शोध घेऊन पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली आहे. या आरोपींकडे चौकशी करताना बनावट नोटा नेमक्या कुठे छापल्या जातात, त्यांचा पुरवठा कोणामार्फत केला जातो, तसेच या रॅकेटचे फॉरवर्ड व बॅकवर्ड लिंकेज उघड करण्याच्या दृष्टीने सखोल तपास सुरू आहे.
याशिवाय, जप्त करण्यात आलेल्या बनावट नोटांची फॉरेन्सिक तपासणी तसेच तांत्रिक परीक्षण संबंधित यंत्रणांमार्फत करण्यात येत असून, त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.
डीवायएसपी बापूराव दडस यांनी सांगितले की, या प्रकरणातील मुख्य सूत्रधारांचा शोध सुरू असून, लवकरच बनावट भारतीय चलन रॅकेटचा पर्दाफाश करून संबंधित मुख्य आरोपींना अटक करण्यात येईल. या गुन्ह्याचा सर्वंकष तपास सुरू असून, दोषींविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Post a Comment
0 Comments