दुरुस्तीच्या नावाखाली लाखोंची उधळपट्टी? १८ लाखांच्या पुलावर तब्बल ₹३७.४२ लाखांची वर्क ऑर्डर; सार्वजनिक बांधकाम विभागावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप
July 22, 2026
0
सत्यवेध न्यूज/दौंड/दत्तात्रय यादव-:
दौंड तालुक्यातील वरवंड–कडेठाण–हटवळण (एमडीआर-९७) मार्गावरील चेन क्र. ६/१०० येथील लघुपुलाच्या दुरुस्ती व पुनर्वसनासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग (पूर्व विभाग), पुणे यांनी ₹३७,४२,४६७ इतक्या रकमेची वर्क ऑर्डर काढल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, प्रत्यक्षात या पुलाच्या मूळ बांधकामाचा खर्च सुमारे ₹१८ लाख असल्याचे सांगितले जात असून, केवळ दुरुस्ती व डागडुजीच्या कामासाठी एवढ्या मोठ्या रकमेची निविदा काढल्याने या कामात मोठ्या आर्थिक अनियमिततेचा संशय व्यक्त केला जात आहे.
उपलब्ध वर्क ऑर्डरनुसार ८ जून २०२६ रोजी कार्यादेश जारी करण्यात आला असून, संबंधित ठेकेदारास हे काम तीन महिन्यांत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. कागदोपत्री हे काम "Rehabilitation and Repairing Work of Minor Bridge" या स्वरूपाचे असल्याचे नमूद आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, संबंधित पुलाची स्थिती पाहता इतक्या मोठ्या निधीची आवश्यकता नसून, केवळ किरकोळ दुरुस्तीच्या कामासाठी कोट्यवधींच्या जवळ जाणारा खर्च मंजूर करण्यात आल्याने संपूर्ण प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. निविदा प्रक्रिया, अंदाजपत्रक तयार करताना वापरलेले निकष, तांत्रिक मंजुरी आणि प्रत्यक्ष कामाचा दर्जा याची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी होत आहे.
या प्रकरणात तज्ज्ञ अभियंत्यांकडून पुलाचे तांत्रिक ऑडिट करून प्रत्यक्ष आवश्यक खर्च आणि मंजूर खर्च यामधील तफावत तपासण्याची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. तसेच, निविदा प्रक्रियेत कोणत्याही प्रकारचा आर्थिक गैरव्यवहार किंवा संगनमत झाले आहे का, याची चौकशी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB) किंवा अन्य सक्षम यंत्रणेमार्फत करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
जर दुरुस्तीच्या नावाखाली शासनाच्या निधीचा अपव्यय झाला असल्याचे सिद्ध झाले, तर संबंधित अधिकारी व ठेकेदारांवर कठोर कारवाई करण्याची गरज असल्याची भावना परिसरात व्यक्त होत आहे.
(टीप : ही बातमी उपलब्ध वर्क ऑर्डर आणि स्थानिक स्तरावर व्यक्त होत असलेल्या आरोपांच्या आधारे करण्यात आली आहे. भ्रष्टाचाराचे आरोप संबंधित सक्षम यंत्रणेकडून चौकशीनंतरच सिद्ध किंवा असिद्ध होतील.)
Tags

Post a Comment
0 Comments