दौंड तालुक्यात पुन्हा गावठी पिस्तुलांचा साठा जप्त; अवैध शस्त्र बाळगणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
July 09, 2026
0
दौंड तालुक्यात पुन्हा गावठी पिस्तुलांचा साठा जप्त; अवैध शस्त्र बाळगणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
प्रतिनिधी:~ दत्तात्रय यादव
यवत: दौंड तालुक्यातील यवत पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध शस्त्रास्त्रे बाळगणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा (LCB) आणि यवत पोलिसांनी संयुक्त कारवाई करत तीन आरोपींना गजाआड केले आहे. या कारवाईत तीन गावठी पिस्तुल आणि १५ जिवंत काडतुसांसह ५ लाख ३७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मात्र, पाठोपाठ होत असलेल्या अशा घटनांमुळे "दौंड तालुका अवैध शस्त्रास्त्रांचा अड्डा बनतोय का?" असा संतप्त सवाल आता उपस्थित होत आहे.
पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांनी अवैध अग्निशस्त्रांविरोधात विशेष मोहीम राबवण्याचे आदेश दिले होते. दरम्यान, यवत परिसरातील भांडगाव येथे काही इसम संशयास्पदरित्या फिरत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. या माहितीवरून पोलिसांनी सापळा रचून एका पांढऱ्या रंगाच्या 'बलेनो' कारला अडवले. चौकशीत मंगेश शंकर मासोळे, सुरज संजय शेलार आणि रोहित प्रेमदास भुजवणे रा यवत यांच्याकडे तीन गावठी पिस्तुल आणि १५ जिवंत। काडतुसे सापडली. याप्रकरणी यवत पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तालुक्यात सुरु आहे नक्की काय?
काही दिवसांपूर्वीच पाटस परिसरातही अशाच प्रकारे पिस्तुल आणि काडतुसांसह आरोपी जेरबंद झाले होते. वारंवार घडणाऱ्या या घटनांमुळे दौंड तालुक्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गुन्हेगारांच्या मनात पोलिसांचा धाक उरला आहे का? की तालुक्यात एखादे मोठे षडयंत्र शिजत आहे? अशा शस्त्रास्त्रांचा पुरवठा करणारे मूळ सूत्रधार कोण आहेत? असे खडे बोल आता नागरिक विचारत आहेत. या अवैध शस्त्र तस्करीमुळे तालुक्यातील तरुण पिढी भरकटत असून, शांतताप्रिय दौंड तालुक्याला गुन्हेगारीचे ग्रहण लागल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
पोलिसांची धडाकेबाज कामगिरी करत
एकीकडे वाढत्या गुन्हेगारीचा प्रश्न गंभीर असला तरी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर आणि यवत पोलीस निरीक्षक संतोष तासगावकर यांच्या पथकाने केलेली ही कामगिरी वाखाणण्याजोगी आहे. मा. पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई महेश डोंगरे व त्यांच्या टीमने ही कारवाई केली.
पुढील तपास यवत पोलीस करत असून, यामागील टोळीचा आणि शस्त्रास्त्र पुरवठादारांचा शोध घेणे आता पोलिसांसमोर मोठे आव्हान असणार आहे. तालुक्यात अशा घटनांना आळा घालण्यासाठी कडक पोलीस गस्त आणि गुन्हेगारांचे कंबरडे मोडणे आवश्यक असल्याचे मत आता सुज्ञ नागरिक व्यक्त करत आहेत.
Tags

Post a Comment
0 Comments