कडेठाण येथे "डॉक्टर आपल्या गावी" पशुवैद्यकीय शिबिर उत्साहात; उपकेंद्र स्थापन करण्याची ग्रामस्थांची मागणी
July 09, 2026
0
प्रतिनिधी:~ दत्तात्रय यादव
कडेठाण (ता. दौंड) : पशुवैद्यकीय चिकित्सालय, कानगाव अंतर्गत मौजे कडेठाण येथे पशुसंवर्धन विभागाच्या वतीने "डॉक्टर आपल्या गावी" या उपक्रमांतर्गत पशुवैद्यकीय आरोग्य शिबिर उत्साहात पार पडले. शिबिरास पशुपालक व शेतकरी यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत आपल्या जनावरांची तपासणी करून विविध योजनांची माहिती घेतली.
यावेळी पशुसंवर्धन विभागाच्या जिल्हा वार्षिक योजना, मुख्यमंत्री ग्रामीण पशुउद्योजकता योजना तसेच पशुसंवर्धनाशी संबंधित विविध शासकीय योजनांची सविस्तर माहिती पशुपालकांना देण्यात आली. शिबिरामध्ये जनावरांसाठी जंतनाशक औषधे, मिनरल मिक्स्चर, गोचीड निर्मूलनाची औषधे तसेच आवश्यक उपचार व मार्गदर्शन करण्यात आले.
या शिबिराला पंचायत समिती सदस्य प्रदीप किसनराव दिवेकर, मा. सरपंच व प्रशासक श्रीमती सोनाली नराळे, मा. उपसरपंच अनिल धावडे यांच्यासह ग्रामस्थ व मोठ्या संख्येने पशुपालक उपस्थित होते.
शिबिराचे प्रमुख मार्गदर्शक डॉ. गोविंद खताळ यांनी पशुधनाचे आरोग्य, लसीकरण, रोगप्रतिबंधक उपाययोजना तसेच आधुनिक पशुपालनाविषयी मोलाचे मार्गदर्शन केले. त्यांच्या तत्पर सेवाभावामुळे व ग्रामीण भागात प्रत्यक्ष जाऊन शेतकऱ्यांना सेवा देण्याच्या उपक्रमाबद्दल ग्रामस्थांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. अशाच प्रकारचे "डॉक्टर आपल्या गावी" हे उपक्रम पुढील काळातही सातत्याने राबवावेत, अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
यावेळी ग्रामस्थांनी एक महत्त्वाची मागणीही प्रशासनाकडे मांडली. कडेठाण गावापासून पशुवैद्यकीय दवाखाना दूर असल्यामुळे जनावरांना उपचारासाठी ने-आण करणे शेतकऱ्यांना खर्चिक व त्रासदायक ठरत आहे. त्यामुळे वेळेवर उपचार मिळण्यात अडचणी निर्माण होतात, असे शेतकऱ्यांनी सांगितले.
यामुळे मौजे कडेठाण येथे कायमस्वरूपी पशुवैद्यकीय उपकेंद्र स्थापन करण्यात यावे, अशी मागणी ग्रामस्थ व पशुपालकांनी प्रशासनाकडे केली आहे. उपकेंद्र सुरू झाल्यास परिसरातील शेकडो पशुपालकांना वेळेवर उपचार, लसीकरण, कृत्रिम रेतन, औषधोपचार तसेच शासकीय योजनांचा लाभ स्थानिक पातळीवर मिळू शकेल, असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला.
शेतकऱ्यांच्या या रास्त मागणीची दखल घेऊन पशुसंवर्धन विभागाने कडेठाण येथे पशुवैद्यकीय उपकेंद्र मंजूर करावे, अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.
Tags

Post a Comment
0 Comments