केडगाव रेल्वे स्टेशनजवळ ग्रामपंचायतीच्या टपरीत अवैध मटका व्यवसाय सुरू?; लेखी तक्रारीनंतरही कारवाईची प्रतीक्षा
July 21, 2026
0
केडगाव रेल्वे स्टेशनजवळ ग्रामपंचायतीच्या टपरीत अवैध मटका व्यवसाय सुरू?; लेखी तक्रारीनंतरही कारवाईची प्रतीक्षा
सत्यवेध न्यूज/दौंड/दत्तात्रेय यादव
दौंड तालुक्यातील बोरी पारधी गावातील केडगाव रेल्वे स्टेशनजवळ असलेल्या मारुती मंदिर परिसरातील ग्रामपंचायतीच्या टपरीमध्ये अवैध मटका व्यवसाय खुलेआम सुरू असल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. या प्रकरणी संबंधितांविरोधात कारवाई करण्याची मागणी करत उपविभागीय पोलिस अधिकारी, दौंड यांच्याकडे लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे.
तक्रारदारांनी दिलेल्या निवेदनानुसार, संबंधित ठिकाणी अनेक दिवसांपासून अवैध मटका व्यवसाय सुरू असून स्थानिक नागरिकांमध्ये याबाबत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. तक्रारदारांनी घटनास्थळी भेट देऊन मोबाईलद्वारे छायाचित्रे व व्हिडिओ चित्रीकरण केल्याचा दावा केला असून, संबंधित पुरावे पोलिस प्रशासनाला देण्याची तयारीही दर्शविली आहे.
तक्रारीत असेही नमूद करण्यात आले आहे की, पोलिसांना ११२ या आपत्कालीन क्रमांकावर संपर्क साधून माहिती देण्यात आली होती. मात्र पोलिस घटनास्थळी पोहोचण्यापूर्वी संबंधित व्यक्ती तेथून निघून गेल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. ग्रामपंचायतीच्या मालकीच्या टपरीमध्ये अवैध व्यवसाय सुरू असताना संबंधित यंत्रणांचे याकडे दुर्लक्ष का झाले? या व्यवसायाला नेमके कोणाचे अभय आहे? स्थानिक प्रशासन आणि पोलिसांकडून यावर ठोस कारवाई होणार का? अशा चर्चांना परिसरात उधाण आले आहे.
दरम्यान, या तक्रारीनंतर आता पोलिस प्रशासन कोणती भूमिका घेते आणि संबंधितांवर महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई केली जाते का, याकडे संपूर्ण दौंड तालुक्याचे लक्ष लागले आहे.
(टीप : सदर वृत्त हे उपलब्ध लेखी तक्रारीतील आरोपांवर आधारित असून संबंधित व्यक्तींची बाजू अद्याप समोर आलेली नाही. अधिकृत चौकशी व पोलिस कारवाईनंतर वस्तुस्थिती स्पष्ट होईल.)

Post a Comment
0 Comments