श्री दत्तात्रेय समस्त दत्त भक्त मंडळ मुंबई महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने गिरणार येथे अन्नक्षेत्र आयोजित दोन दिवसीय धार्मिक सामाजिक व सांस्कृतिक सोहळ्याला रविवारी उत्स्फूर्त वातावरणात प्रारंभ झाला
July 19, 2026
0
सत्यवेध न्यूज
संपादक : गणेश दिवेकर |
गिरणार : श्री गुरुदत्तात्रेय समस्त भक्त मंडळ, मुंबई (महाराष्ट्र) यांच्या वतीने गिरणार येथील अन्नक्षेत्रात आयोजित दोन दिवसीय धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक सोहळ्याला रविवारी उत्साहपूर्ण वातावरणात प्रारंभ झाला. देशभरातून आलेल्या हजारो गुरुबंधू-गुरुभगिनींच्या उपस्थितीत भक्ती, सेवा आणि संस्कृतीचा अनोखा संगम अनुभवायला मिळत आहे.
पहिल्या दिवशी सकाळी श्री गुरुदत्तात्रेय गिरणारी पादुकांची महापूजा, अभिषेक तसेच श्री दत्त सहस्त्रनामद्वारे लक्षार्पण करण्यात आले. त्यानंतर सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले.
यावेळी 'दत्ता डिजिटल महाकुंभ' आणि 'दत्त डिजिटल महाकुंभ रील महोत्सव' स्पर्धेतील विजेत्यांचा पारितोषिक वितरण समारंभ परमपूज्य गुरुवर्य श्री महेश गिरी बापू यांच्या हस्ते पार पडणार असून, यानिमित्ताने ते उपस्थित भाविकांना आशीर्वादपर मार्गदर्शन करणार आहेत.
दुपारच्या सत्रात वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज यांच्या जन्मभूमीतील गायक आणि वादकांच्या सादरीकरणातून दत्त गीतांचा जागर रंगणार आहे. सायंकाळी श्री गुरुदत्तात्रेय गिरणारी पादुका आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले असून दत्त चौक, लंबे हनुमान मंदिर, पहिली पायरी, भवनाथ महादेव मंदिर मार्गे अन्नक्षेत्रापर्यंत मिरवणूक काढण्यात येणार आहे. दत्त बावनी आणि हनुमान स्तोत्र पठणाने मिरवणुकीला प्रारंभ होणार आहे.
या धार्मिक सोहळ्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे भाविकांच्या सेवेसाठी उभारण्यात आलेला भव्य मोफत मेडिकल कॅम्प. हजारो भाविकांना आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी यासाठी अनुभवी डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी आणि स्वयंसेवक कार्यरत असून रक्तदाब, मधुमेह, ऑक्सिजन पातळी, प्राथमिक आरोग्य तपासणी तसेच आवश्यक औषधांचे मोफत वितरण करण्यात येत आहे. गुरुशिखर दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी विशेष वैद्यकीय पथकही सज्ज ठेवण्यात आले आहे.
२० जुलै रोजी पहाटे चार वाजता सर्व भाविक गुरुशिखर चरण पादुका दर्शनासाठी रवाना होणार आहेत. दर्शनासाठी आधार कार्ड सोबत बाळगणे अनिवार्य असून स्कॅनिंगनंतरच प्रवेश दिला जाणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे. दर्शनानंतर सामूहिक आरती आणि महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे.
धार्मिक कार्यक्रमासोबत समाजसेवा, आरोग्य सेवा आणि सांस्कृतिक परंपरेचे जतन करणारा हा दोन दिवसीय सोहळा गिरणार येथे भाविकांसाठी भक्तिमय आणि अविस्मरणीय ठरत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

Post a Comment
0 Comments