वडिलांच्या कष्टांचे चीज! कडेठाणच्या संस्कार दिवेकरची इस्रो परीक्षेत उत्तुंग भरारी
July 17, 2026
0
इस्रो केंद्राला भेट देण्याची मिळाली सुवर्णसंधी; ग्रामीण भागातील विद्यार्थ्याने गाजवले नाव
दैनिक सत्यवेध
प्रतिनिधी~: दत्तात्रेय यादव
कडेठाण गुरुदत्त शिक्षण संस्थेच्या कै. त्रिंबक दिवेकर विद्यालयातील हुशार विद्यार्थी, संस्कार दत्तात्रय दिवेकर याने भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (ISRO) वतीने आयोजित करण्यात आलेल्या कठीण स्पर्धात्मक परीक्षेत घवघवीत यश मिळवले आहे. या यशाच्या जोरावर संस्कारची बेंगळुरू येथील इस्रो मुख्यालय किंवा श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्राला चार ते पाच दिवसांच्या शैक्षणिक अभ्यासदौऱ्यासाठी निवड झाली आहे. संस्कारच्या या कामगिरीमुळे संपूर्ण कडेठाण गावासह शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
प्रतिकूलतेवर जिद्दीने केली मात
संस्कारचे यश जितके कौतुकास्पद आहे, तितकाच त्यामागील संघर्षही प्रेरणादायी आहे. अत्यंत प्रतिकूल आर्थिक परिस्थिती असतानाही, मुलाने उच्च शिक्षण घेऊन देशाचे नाव उंचावावे, या एकाच ध्येयाने त्याचे वडील श्री. दत्तात्रय दिवेकर यांनी अहोरात्र कष्ट घेतले. वडिलांचा त्याग, मुलाची अभ्यासातील जिद्द आणि शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन या त्रिवेणी संगमातूनच हे यश प्राप्त झाले आहे.
अंतराळ संशोधनाचा मिळणार प्रत्यक्ष अनुभव
या शैक्षणिक दौऱ्यात संस्कारला भारताच्या अंतराळ संशोधनातील आधुनिक तंत्रज्ञान, उपग्रह निर्मिती आणि रॉकेट प्रक्षेपण प्रक्रियेचे थेट दर्शन घडणार आहे. देशातील सर्वोच्च शास्त्रज्ञांशी संवाद साधण्याची आणि त्यांच्या कार्याचा जवळून अनुभव घेण्याची अमूल्य संधी त्याला या दौऱ्यामुळे मिळणार आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थी जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर आकाशही गवसणी घालू शकतात, हे संस्कारने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.
सर्व स्तरांतून कौतुकाचा वर्षाव
संस्कारच्या या यशाबद्दल गुरुदत्त शिक्षण संस्था, मुख्याध्यापक श्री. दिवेकर सर, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि ग्रामस्थांनी त्याचे अभिनंदन केले आहे. संस्कारची ही भरारी केवळ त्याच्या कुटुंबासाठीच नव्हे, तर परिसरातील इतर विद्यार्थ्यांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे.
Tags

Post a Comment
0 Comments