Type Here to Get Search Results !

सत्यवेध न्यूज़

सत्यवेध न्यूज़

वारीत जनसेवा, पर्यावरण संवर्धन आणि वाचन संस्कृतीचा अनोखासंगम; सकल मराठा फाउंडेशनच्या सदस्याचा प्रेरणादायी उपक्रम

वारीत जनसेवा, पर्यावरण संवर्धन आणि वाचन संस्कृतीचा अनोखासंगम; सकल मराठा फाउंडेशनच्या सदस्याचा प्रेरणादायी उपक्रम
प्रतिनिधी:~दत्तात्रय यादव श्री संत तुकाराम महाराज व संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्यात दरवर्षी लाखो वारकरी सहभागी होत असतात. या वारकऱ्यांच्या सेवेसाठी विविध सामाजिक संस्था आणि स्वयंसेवक कार्यरत असतात. यावर्षी सकल मराठा फाउंडेशनच्या वतीने वारकऱ्यांना मोफत वैद्यकीय (मेडिकल) सेवा पुरविण्यात येत असून, या सेवेमध्ये फाउंडेशनचे सदस्य गणेश नाणेकर यांचा अनोखा उपक्रम विशेष आकर्षण ठरत आहे. पिंपरी-चिंचवड येथील रहिवासी असलेले गणेश नाणेकर यांनी स्वतःची रिक्षा पूर्णपणे इको-फ्रेंडली संकल्पनेवर आधारित तयार केली आहे. या रिक्षेमध्ये विविध प्रकारची छोटी-छोटी झाडे लावण्यात आली असून, संत तुकाराम महाराजांच्या "वृक्षवल्ली आम्हा सोयरे" या विचाराला प्रत्यक्ष कृतीतून उजाळा देण्यात आला आहे. पर्यावरण संवर्धनाचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचावा आणि प्रत्येकाने वृक्षलागवडीचे महत्त्व ओळखावे, हा या उपक्रमामागील उद्देश आहे. विशेष म्हणजे या रिक्षेमध्ये प्रवाशांसाठी लघु वाचनालय (लायब्ररी) उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्यामध्ये विविध पुस्तके तसेच रोजची दैनिक वृत्तपत्रे ठेवण्यात आली आहेत. याशिवाय आपत्कालीन परिस्थितीसाठी फर्स्ट एड बॉक्स देखील ठेवण्यात आला असून, प्रवाशांच्या सोयी-सुविधांचीही काळजी घेण्यात आली आहे. गणेश नाणेकर यांनी सांगितले की, या उपक्रमाची प्रेरणा त्यांना त्यांच्या पत्नी सारिका नाणेकर यांच्याकडून मिळाली. "समाजाला प्रेरणा देणारी आणि पर्यावरणाचा संदेश देणारी रिक्षा तयार करा," असा सल्ला त्यांनी दिला. स्वतःलाही झाडांविषयी विशेष प्रेम असल्यामुळे ही संकल्पना प्रत्यक्षात साकारल्याचे त्यांनी सांगितले. एकीकडे सकल मराठा फाउंडेशनच्या माध्यमातून श्री संत तुकाराम महाराजांच्या वारीत वारकऱ्यांना मोफत मेडिकल सेवा, तर दुसरीकडे पर्यावरण संवर्धन, वाचन संस्कृती आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देणारी इको-फ्रेंडली रिक्षा अशा दुहेरी समाजोपयोगी कार्यामुळे गणेश नाणेकर आणि सारिका नाणेकर यांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. त्यांचा हा उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी ठरत असून, जनसेवा हीच खरी ईश्वरसेवा असल्याचा संदेश देत आहे.

Post a Comment

0 Comments